मुक्या म्हणे...

Monday, August 08, 2011

नीना...२

नीना,
तू अजूनही येतेस माझ्या स्वप्नांत.
घेतेस मला गुरफटून
तुझ्या मऊ सुती पदराच्या
गंधाळलेल्या उबेत.
केसांमधून जाणवतात
तुझी सुरकुतलेली जादुई बोटं.
आणि ऐकू येत मंदमंद
तुझ्या बिनदाताच्या मुखातून
मृदुमुलायम झालेल्या स्वरांचं एक गाणं.
पहाटे कुण्या पक्षाच्या आवाजात
जे विरून जातं कुठेतरी…

सकाळी जागा होतो तेव्हा
मी रात्रभर पांघरलेल्या
तुझ्या त्याच मऊ सुती लुगड्याच्या गोधडीतून
येत असतो तुझा चंदनी गंध.

नीना, त्या चंदनखोडासारखीच तू…
कधी संपलीस… मला कळलंच नाही.


नीना…१

नीना…
एखाद्या परीकथेतली जणू तू.
शुभ्र केसांची नि भुऱ्या डोळ्यांची...
बुढ्ढी के बालवाल्याकडच्या
मिठाईसारखेच तुझे ते केस
आणि तितकाच गोडवा तुझ्यातही.
एखाद्या परीच्या शुभ्र रेशमी चमचम झग्यासारखं
भरजरी नेसलेलं तुझं म्हातारपण.
तितकंच जादुई ते तुझं जगही…

काहीतरी जादू होती खरी तुझ्याकडं…
रात्री झोपताना तू सांगितलेल्या
त्या साऱ्या पऱ्यांच्या गोष्टींचं
स्वप्नांत रूपांतर करणं,
नीना कसं गं जमायचं तुला?
आणि सकाळी जागं करतानाचा
तुझा नितळ दैवी चेहरा बघून
दिवसभर असं वाटायचं
स्वप्न संपलंच नाहिये अजून…

जादू नक्कीच होती तुझ्याकडं…
तुझ्या हातात पडलेली प्रत्येक गोष्ट
जादूचीच जणू होई,
मग ती एखादी साधी पळी असो
वा अगदी बारीक छोटीशी सुई.
शिळ्यापाक्याचीही पक्वान्न करायचीस..
आणि जुन्या साड्यांचे झगे.
पडक्या परसाची करायचीस बाग
अन हरखून जायचे बघे.

पंख तर नक्कीच होते तुझ्याकडं,
कधी कुणाला दिसत नसतील तरी.
कारण पूर्ण दोन पिढ्यांचं अशक्य अंतर
काही क्षणांतच कापून,
अलगद उतरायचीस तू
आमच्या भातुकलीच्या घरात
अगदी आमच्याएवढीच होऊन.

काही अशक्य गोष्टीही जमायच्या तुला,
मी गुडघे फोडून घेतल्यावर
साध्या खोबऱ्याच्या तेलानंही
जखमा भरण्याची जादू होती तुझ्या बोटांत.
त्याच सुरकुतलेल्या बोटांनी पुसायचीस माझे डोळे
आणि साऱ्या अश्रूंचं हसू बनवून
ठेवायचीस नकळत माझ्या ओठांवर.
मग ठेवायचीस माझ्या तळहाती
जादूमंतर करून तुझा तो साखरदाण्यांचा खाऊ,
ज्याचा कधी न संपणारा तुझा डबा
तुझ्या ट्रंकेत अजुनही शोधतोच आहे मी.

तुझ्या गावी दु:खं दिसलीच नाही कधी.
तुला काही दु:खं अशी नव्हतीच का गं?
की ठेवून आली होतीस तीही,
दूर सातासमुद्रापलिकडल्या
अज्ञात बेटावरच्या उंच मनोऱ्यावर,
सात पेट्यांमधल्या बंद पेटीत.
तुझ्या त्या साखरदाण्यांच्या डब्यासारखंच कुठेतरी.

आणि रूपं बदलणंही जमतच होतं ना तुला?
ओव्याअभंगांपासून म्हणीउखाण्यापर्यंत
सारं तोंडपाठ असणारी बहिणाबाई,
गाथापुराणांपासून इतिहासाकथांपर्यंत
सारं सारं सांगणारी  जणू जिजाई,
आजारपणातली माझी सख्खी सोबतीण,
किंवा माझ्या अनेक खोड्यांची रहस्य
गुपचूप दडवून ठेवणारी माझी मैत्रीण...
काहीही अगदी सहजच होऊ शकायचीस तू.
मग त्या माझ्या मैत्रीणीचं रूप घेताघेताच
कधीतरी नानीची 'नीना'ही अशीच झाली असावीस तू.

~~~

नीना,
कधी कधी पावसातून घरी येताना अजूनही वाटतं,
की शुभ्र चमचम केसांच्या परीसारखी दार उघडशील …
भिजलेल्या मला टिपून घेशील
तुझ्या मऊ सुती पदरानं,
आणि ठेवशील माझ्या तळहाती
जादूमंतर करून तुझा तो साखरदाण्यांचा खाऊ.

एवढी एक जादू तुला जमायला हवी होती गं...