मुक्या म्हणे...

Thursday, June 01, 2006

पप्या बी साला..

पप्या बी साला लई बाराचाय..
म्हंतो ‘ कायतरी करायला पायजे..’
गल्लीत यार लई बोर होतं..
दिल्लीच्या राजकारणात शिरायला पायजे.
तोडपानी , हप्तापानी .. साला इन्कमच नाय..
वर्षाकाठी चारपाच घोटाळे करुन
चांगला लंबाचौडा हात मारायला पायजे..

धमक्या द्या, ग्यांग पाठवा,
सालं कुत्रं बी आजकाल खात नाय..
मामालोकांना वाटत बसलो
तर खिशात कायपन –हात नाय..
राव हप्ते मागत बसण्यापेक्षा
आता मतं मागत फिरायला पायजे..
पप्या बी साला लई बाराचाय..
म्हंतो ‘ कायतरी करायला पायजे..

हिकडं घोडा घेऊन ग्यांग चालवा,
फारतर फार गल्ली डरेल.
तिकडं खादी घालून पक्ष चालवा,
साला आय शी यस वाला बी सलाम करेल..
इथं कट्ट्यावर सडत बसण्यापेक्षा
दिल्लीचा रस्ता धरायला पाहिजे.
पप्या बी साला लई बाराचाय..
म्हंतो ‘ कायतरी करायला पायजे..

खरं सांगतो यार तुला,
हिकडं काय पन खरं नाय..
दिवसाकाठी हजार बाराशे
कमाई हाय पन साला ब्यालंस नाय,
सात पिढ्या खातील बसून.
यार येवढा तरी ब्यालंस उरायला पायजे.
पप्या बी साला लई बाराचाय..
म्हंतो ‘ कायतरी करायला पायजे..

तू येकच हाक चाळीत टाक
शंभर कार्यकर्ते तयार होतील.
सणावाराला वाढदिवसाला
चौकांत होर्डिंग उभे –हातील.
म्हनून म्हंतो कसा का व्हईना
यंदा पक्ष उभारायला पायजे..
पप्या बी साला लई बाराचाय..
म्हंतो ‘ कायतरी करायला पायजे..

1 Comments:

At 5:13 PM, Blogger Dilip K. Deurmale said...

very well job you done sir.i like it. Mi hi kavita vartman patrat deu ka ?

 

Post a Comment

<< Home