मुक्या म्हणे...

Monday, March 27, 2006

सती..

त्यादिवशी दवाखान्याबाहेर ब-याच वर्षांनी ती भेटली.
राहती माणसं गेल्यावरती उजाड व्हावं घर तशी
सूनी भकास झालेली..
आणि भिंत भिंत कोसळ्ल्यावर फक्त उरावेत वासे
तशी केवळ सांगाडा राहिलेली.
मनात आलं हीच का ती वेडी पोर ?
नाकात वारं शिरल्या वासरागत सारं शिवार पालथं घालणारी,
कोकरांमागं धावणारी नि पाख्ररांसोबत बोलणारी ?

चेह-यातच कुठेतरी खोल गेलेले तिचे डोळे..
हेच डोळे कधीतरी वर्गात चोरून बघायचे..
फुलपाखरांगत भिरभिरायचे,
कधी लटके रूसून बसायचे, खट्याळ खोड्या करायचे..
त्या डोळ्यांमध्ये आज कुठलीशी उदास धून होती..
अन खपली निघून गेल्यावरही वण तसाच राहावा,
तशी भाळी उरलेली पुसल्या कुंकवाची खूण होती..

चार गोष्टी बोलून झाल्यावर,
आठवणींची दार खोलून झाल्यावर,
म्हणाली,” तोलामोलाचा घरोबा अन भरलं घर पाहून दिलं.
मोठ्या हौसेनं थाटामाटात बापानं लगीन लावून दिलं..
मीही नव-याला देव समजून ठेवला होता पायी जीव..
पापण्यांत हजार स्वप्नं घेऊन ओलांडली होती गावशीव..
पण त्याच देवानं पदरी असा निखा-यांचा भोग दिला.
पहिलीवहिली भेट म्हणून हा विखारी रोग दिला..
पहाडासारखा नवरा माझा पोखरल्या झाडागत मोडून गेला..
या सरणाच्या वाटेवरती मला अशी सोडून गेला.

पहिलीवहिली पोर माझी, जणू अवखळ पाण्याची लाट..
रक्तातूनच घेऊन आली परतीची ती भयाण वाट..
हा रोग म्हणजे टोळधाड, टिकलं नाही एकही झाड.
मग माझी पोर तर इवलं फूल, कसा करील तिचे लाड ?
तरी आल्यासारखी वेडी चार दिवस राहून गेली,
माझ्या कुशीत शहाण्यासारखी चार दिवस पाहून गेली..

आता सासर नाही, माहेर नाही, आपलेपणाचा आहेर नाही.
बंद झालयं हरेक दार..तसे दिवसही राहिलेत चार..
या रांगेत आता औषधासाठी निमूट येऊन उभी राहते.
दिवस दिवस ढकलत राहते मरणाला असं पुढं पुढं..
जिवंतपणे वाहत जाते मीच जणू माझंच मढं..

कुणाला काही सांगताना आता काळीज फाटत नाही.
इतर रोग्यांइतकेच आता याही रांगेत असतात लोक,
म्हणून इथं उभं राहताना आजकाल काही वाटत नाही.
पण याच रांगेत कुल्टाही अन वेश्याही येत असतात पुन्हा पुन्हा..
कुणीतरी सांगेल का की पतिव्रतेचा काय गुन्हा ?
नीतीमत्ता सोडली ज्यानं त्याची ऐसी परिणती..
मग त्याच सरणामध्ये मीही का म्हणून जावं सती..?

- मुकुंद भालेराव..