मुक्या म्हणे...

Tuesday, September 18, 2007

कोणे एके काळी...

कोणे एके काळी
चमचमत्या पाण्याची एक नदी होती..
आरस्पानी...
तळाशी तिच्या एक गाव होतं...
छोट्या छोट्या जीवांचं... आबादानी..

नदी शांत वाहत राही, सर्वांवरून..
सान-थोर, अमीर फकीर वा भला बुरा असो कोणी..
नि आपल्याच नादात वाहत जाई,
स्वतःचे स्फटीकी आरस्पानी सत्व जाणून
त्या नदीचे चमचम पाणी..

तो प्रत्येक जीव आपापल्या परीनं
तळाशी वेलींना वा खडकांना लटकून राही..
कारण लटकणं हेच होतं जगणं..
आणि प्रत्येक जण शिकून आला होता..
गर्भातूनच,
फक्त प्रवाहात तग धरणं...

पण एक दिवस...
शेवटी म्हणाला एक जण,
'मला या लटकण्याचा वैताग आलाय जाम..
आणि बघू शकत नसलो तरी
माझा विश्वास आहे ठाम...
या प्रवाहात ठाऊक आहे तो जातोय कुठे..
मी झोकून देईन स्वतःला या चमचम पाण्यात..
नि ते घेऊन जाईल मलाही तिथं..
नाहीतर वैतागानेच मरेन रे मी..
असाच जर लटकून राहीलो या इथं'..

मग बाकीचे जीव म्हणाले हसून..
' वेड्या, हाच प्रवाह ज्याचा भक्त आहेस तू..
हा आहे भयाण लाटांचा पूर...
या खडकांवर आदळत आपटत फरपटत,
फेकील तुला अस्सं दूर..
की मग या वैतागापेक्षाही लवकर मरशील तू'...

पण त्यानं ऐकलंच नाही कुणाचं,
आणि लांब एक श्वास घेऊन
त्या चमचम पाण्यामध्ये दिलं स्वतःला झोकून..
वेडा बिचारा त्या प्रवाहाकडून
आदळला आपटला फरपटला गेला...
पण तोही बिलंदर मोठा,
त्यानं पुन्हा लटकायला नकार दिला.

मग प्रवाहानं उचललं त्याला,
मुक्तपणे अलगद तळापासून वर..
अन संपली सारी फरपट..
आदळआपट आणि मरमर..

धारेखालचे ते सारे जीव,
ज्यांना होता नवखा तो, ओरडले,
'अरे बघा हे नवल काय..!!
हा जीव आपल्या सारखाच जरी..
तो उडतो, तरंगतो आहे तरी'..
कुणी म्हणालं,
'मसीहा आहे तो.. आपला तारणहार आहे..
आपल्या सर्वांना तारणार आहे'..

प्रवाहासोबत वाहणारा तो जीव म्हणाला,
'अरे मी कोणी मसीहा नाही..
साधा जीव आहे मी तुमच्याच सारखा..
या नदीला आवडतं
आपल्याला मुक्त उचलून घ्यायला..
पण फक्त थोडं साहस हवं..
या लाटांवर झोकून द्यायला..
हा प्रवासच आहे आपलं काम खरं,
हे साहस म्हणजेच आहे जगणं..
नुसतं लटकणं नाही बरं'...

पण त्यांनी आणखीच घोष केला,
"तारणहार !!...तारणहार !!!..."
त्या वेलींना नि खडकांना लटकत राहीले तसेच,
त्यांनी परत पाहिलं तर तो गेलेला होता..
आणि ते सांगत राहिले मागे,
त्या तारणहाराच्या कथा...

(रिचर्ड बाक च्या 'जोनाथन लिव्हिंगस्टोन सिगल' या पुस्तकातील प्रास्ताविक गद्यकाव्याचा स्वैर अनुवाद.)