मुक्या म्हणे...

Wednesday, October 03, 2007

एक कविता लिहीन म्हणतो...

एक कविता लिहीन म्हणतो,
शब्दांमध्ये न मावणारी..
काळजाचा ठाव घेत मनामनाला भावणारी..

रणरणत्या सिग्नलपाशी
थांबलेलं एक बालपण..
घासासाठी कोरभर करतं रोज वणवण..
इवलीशी पावलं.. रस्ताभर चटके..
चार आण्यांचा फुटला कप,
त्याला बाराआण्यांचे फटके..
नावामागे लावायला बापाचंही नाव नाही,
पाटी नाही, शाळा नाही, अक्षरांचा गाव नाही.
पोट भरायला शिकताना राहून जातं शिकणं,
भाळी येतं धक्के खाणं आणि पेपर विकणं..
हव्याहव्याशा सुखांचा जमत नाही थाट..
काही कळण्याआधीच लेकरू चुकतं वाट.
त्याला पडताना सावरणारी,
तो चुकला की कावणारी..
आयुष्याचा ध्रुव होऊन त्याला दिशा दावणारी..
एक कविता लिहीन म्हणतो,
शब्दांमध्ये न मावणारी..

माथ्यावरती अठराविश्वे दारिद्र्याचा शाप..
कितीही गाळला घाम तरी भरत नाही माप.
कर्जाची जू ओढत उपसत बसतो कष्ट..
सुखाचा एक ढगही साधा दिसत नाही स्पष्ट.
पोराचं शिक्षण.. पोरींची लग्नं..
घरदार पडलं गहाण, दुष्काळाचं विघ्न...
आभाळभर दाटतात मग हे विषारी प्रश्न.
कुठून आणावं आता सुख मागून उसनं?
जड जायला लागतो रोज ताटातला घास..
पिंपळाशी वाट बघतो.. लोंबणारा फास.
परिस्थितीच्या वादळात
जिद्दीचं पीक लावणारी..
शिवारभर ओसंडत त्याच्या नवसाला पावणारी,
एक कविता लिहीन म्हणतो,
शब्दांमध्ये न मावणारी..

पुढा-यांच्या डोळ्यांवरती हव्यासाचे पडदे..
धर्मांधांच्या गोळ्यांखाली माणुसकीचे मुडदे..
अमका पक्ष... तमकी सभा,
कापाकापीला पूर्ण मुभा..
दादांना भाईंना मंत्र्याचे छत्र..
हप्तावसुलीला शिफारस-पत्र.
सामान्य माणुस?
बिशाद काय त्याची?
रस्त्यात मेला तरी खातंय का कुत्रं ?
त्याच्या कष्टाचा पडलाय रे भाव.
ऐतखाऊ भ्रष्टांचे शिजताहेत डाव..
कावेबाज लांडग्याचे दिल्लीपर्यंत हात..
फळली नाही दिल्ली तर, साला दुबईको जाव...

मग शतमुखांचा शेष होऊन
खलांच्या टाळूस चावणारी,
हातांमधल्या मशालींतून
क्रांतीची आग लावणारी..
एल्गाराचा घोष बनून
नसानसांतून धावणारी..
एक कविता लिहीन म्हणतो,
शब्दांमध्ये न मावणारी..